अन्नपूर्णा योजना


अन्नपूर्णा योजना

उद्दिष्ट अन्नपूर्णा योजनेचे...

अन्न ही मानवाची सर्वात प्राथमिक गरज आहे. शरीराला पोषण देणारे, जीवन देणारे पोटभर आणि सकस अन्न मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. गरीबी अनुभवलेल्या, अथक कष्ट, मेहनत घेऊन चिकाटीने आपली कारकीर्द घडविणार्‍यांस याची जाण अधिक असते. सहकार मंत्री मा. सुभाष(बापू) देशमुख यांचे बालपण शेतकरी व कष्टांची जाण असणार्‍या कुटुंबात गेले. बिकट परिस्थितीमधून त्यांनी आपले जीवन घडविले.

पोटभर अन्न मिळविण्यास असमर्थ असणार्‍या प्रत्येकाच्या मुखात घास पडावा. प्रत्येक भुकेल्या जीवाला दोन वेळचे सकस व पुरेसे अन्न पुरविता यावे या बापूंच्या विचारातून अन्नपूर्णा योजना प्रत्यक्षात आली. पुणे शहराचा 'स्मार्ट सिटी' बनण्याकडे प्रवास सुरू झाला आहे. परंतु, कोणतेही शहर खर्‍या अर्थाने स्मार्ट तेव्हाच होईल जेव्हा तेथे कोणीही उपाशी राहणार नाही. शहराला भूकमुक्त आणि स्मार्ट बनविण्यासाठी तुम्हीही अवश्य योगदान द्या.

पार्श्वभूमी सोलापूर सोशल फाऊंडेशनची

सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित व बुद्धीमान समाजाचे विविध कारणांमुळे अन्यत्र स्थलांतर झाल्याने तेथे नवीन उद्योग निर्माण होण्याच्या शक्यता कमी होऊ लागल्या, त्याचबरोबर नोकरीच्या संधीही कमी होऊ लागल्या. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या प्रगतीवर होऊ लागला. हे थांबवावे व सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण उत्कर्ष साधावा या उद्देशाने सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज हे फाऊंडेशन अनेक समाजोपयोगी कार्ये करत आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशनचा पहिला टप्पा मुंबईत तर दुसरा पुण्यात सुरू झाला. फाऊंडेशनचा आवाका केवळ सोलापूर जिल्हयापुरता मर्यादित न ठेवता अधिकाधिक क्षेत्रात जनहिताची कामे केली जावीत या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत.

'अन्नपूर्णा योजना' ही सोलापूर सोशल फाऊंडेशनची एक महत्वाकांक्षी योजना आहे. भुकेल्या जीवांना पोटभर आणि पोषणयुक्त अन्न पुरविले जावे आणि उपासमारीचे समूळ उच्चाटन व्हावे हे ध्येय घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. आपण विविध प्रकारे योगदान देऊन या सत्कर्मासाठी हातभार लावू शकता.

आपण या योजनेसाठी आर्थिक स्वरुपात मदत देऊ शकता, अन्न-धान्य अथवा वस्तूंच्या स्वरुपात मदत देऊ शकता, तसेच स्वयंसेवक म्हणून अथवा काही काळासाठी प्रत्यक्ष श्रमदान अशा कोणत्याही स्वरुपात आपले योगदान देऊ शकता.



भूकमुक्त शहर - खरे स्मार्ट शहर

आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदान हे अतिशय महान आणि पवित्र कार्य मानले गेले आहे. अन्न केवळ भूक भागवत नाही तर ते शरीराचे पोषण करते, ऊर्जा देते त्याचबरोबर मन व आत्माही तृप्त करते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशके उलटूनही आज आपल्या देशात असणारे भीषण वास्तव हे आहे की, येथील अनेक नागरिकांना दोन वेळा चौरस आहार मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल अथवा शारीरिकदृष्ट्या अपंग नागरिक, ज्यांना त्यांच्या कुटुंबांद्वारे दुर्लक्षित केले गेले आहे अथवा त्यांचे कुटुंब नाही किंवा वृद्धापकाळात सांभाळ करणारे कोणी नाही, अशा कितीतरी व्यक्तींना उपासमारीस तोंड द्यावे लागते. स्वतःसाठी अन्नाची व्यवस्था करण्यास असहाय्य नागरिकांना हाल सोसावे लागू नयेत यासाठी आम्ही सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे 'अन्नपूर्णा' ही योजना राबवित आहोत. या योजनेचा सुरुवातीचा टप्पा पुण्यामध्ये सुरू होत आहे.

पुणे शहर 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी निवडले गेले आहे व आता या शहराचा स्मार्ट सिटी होण्याकडे वेगाने प्रवास सुरू आहे. येथील कोणीही नागरिक उपासमारीने ग्रस्त नसेल, हे शहर जेव्हा भूकमुक्त होईल तेव्हाच ते खर्‍या अर्थाने 'स्मार्ट सिटी' होईल. या प्रवासात आपली साथ मिळाली तर हा प्रवास अधिक सोपा, अधिक बळकट होईल. आपण या योजनेस अवश्य हातभार लावा.