दाते पंचांग

महाराष्ट्रात सात-आठ पंचांगं आहेत. परंतु दाते पंचांगाने महाराष्ट्रच नव्हे तर देशात आपली ख्याती निर्माण केली आहे. काळाबरोबर राहिले पाहिजे याचे भान तिसर्‍या पिढीतील मोहन दाते आणि विनय दाते यांच्याबरोबरच चौथ्या पिढीतील ओंकार दाते या सर्वांना आहे. त्यामुळे 21 व्या शतकातील तरुण पिढीसाठी दाते पंचांग हे दिनदर्शिका स्वरूपात प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे.

कै. लक्ष्मण गोपाळ दाते यांनी 1916-17 मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. या कार्यामध्ये त्यांच्यासोबत कै. पं. धुंडिराजशास्त्री दाते हे 1945 पासून सहभाग घेऊ लागले.पूर्वी गणितामध्ये असलेली स्थूलता घालवून अधिक सूक्ष्म असलेली दृकगणित 1950 मध्ये स्वीकारले. दाते पंचांगने ऐतिहासिक बदल केल्यानंतर इतर पंचांगकर्त्यांनीही दृकगणित स्वीकारले. शिवाय पंचांगातील वेळा घटी आणि पळे यांच्यामध्ये दिल्या जायच्या. त्याऐवजी घड्याळातील वेळा देऊन लोकांना समजेल अशी रचना केली. त्यानंतर या दोघांबरोबर कै. श्रीधर लक्ष्मण दाते हेसुद्धा पंचांग कार्यात सहभागी झाले. दाते पंचांगाला  महाराष्ट्रात आदराचे स्थान मिळाले आहे.पूर्वीचे जुने पंचांग उपलब्ध होत नसल्याने जुन्या काळातील पंचांगाचे नव्याने गणित करून सन 1939 ते 2011 पर्यंतचे पंचांग ज्योतिषांना अभ्यासासाठी पाच-पाच वर्षांच्या संचामध्ये उपलब्ध करून दिले आहे.

पंचांगात असलेले सण, वार, पत्रिकामिलन आदी विषयांवर लोकांकडून येणार्‍या शंकांचे निरसन पत्र, फोन, मेल, संकेतस्थळ आदी माध्यमांद्वारे केले जात आहे. दाते यांचे स्वत:चे गणपती मंदिर असून, त्याला 200 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दाते घराणे मूळचे कोकणातील गणपती पुळेजवळील नेवरे गावचे. त्यांचे पूर्वज 300 वर्षांपूर्वी सोलापुरात येऊन स्थायिक झाले. आज दाते पंचांगाला 100 वर्षे, गणपती मंदिराला 200 वर्षे आणि दाते घराण्याला सोलापुरात स्थायिक होऊन 300 वर्षे झाली आहेत.

तर पंचांग बंद पडले असते.

पंचांग सुरू केल्यानंतर त्याची विक्री होणे महत्त्वाचे होते. पहिली तीन वर्षे नुकसानीत गेले. चौथ्या वर्षी नुकसान झाले तर ते पंचांग कार्य बंद करावे, असा विचार त्यांच्या मनात येत होता. परंतु सुदैवाने चौथ्या वर्षी पंचांग व्यवसायात थोडीफार वृद्धी झाली. त्यामुळे आजचे हे पंचांगाचे व्यापक स्वरूप पाहायला मिळत आहे. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात धुंडिराजशास्त्रींना अटक झाली. तेव्हा त्यांनी तुरुंगातून राष्ट्रीय पंचांगाचे काम केेले.

Share: