निरा नृसिंहपूर

नीरा आणि भिमा या नद्यांच्या संगमावर वसलेले श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान आहे. इंदापूरपासून हे स्थान केवळ 3 किलोमीटरवर आहे.

अष्टकोनी आकारातील चिरेबंदी मंदिराला 33 उंच चिरेबंदी पायर्‍या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर अनेक देवतांची मंदिरे आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा, पुढे गर्भागार, रंगशिला सभामंडप अशी रचना आहे. ते सर्व दगडी बांधकाम खसखशी टाकीचे आहे. दगडी बांधकामाच्या छतावरील देवतांच्या मूर्ती, बेलपाने, नक्षीकाम मनोवेधक आहे. पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. मंदिराच्या भोवताली नदीपातळीपासून नव्वद फूट उंचीचा भव्य तट आहे. नदीपासून मंदिर नव्वद फूट उंच असल्याने तेथे पुराचा धोका नाही. बाहेरच्या तटाला वीटकामाचे दोन बुरूज आहेत. त्यामुळे बाहेरून मंदिर किल्ल्यासारखे दिसते. मंदिराच्या मुख्य गर्भागारालगत श्री लक्ष्मीचे छोटे मंदिर आहे. नृसिंहमंदिराच्या गर्भगृहावरील शिखर सत्तर फूट उंच आहे. त्यावर सुंदर कलाकुसर आहे. दगडी बाजूवर सुबक शेषशायी भगवानाची मूर्तीही आहे. श्री लक्ष्मीमंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी वर्षभर पाणी ठिबकत असते. त्यास गुप्तगंगा असे म्हटले जाते. नीरा, भीमा या गंगा-यमुना तर शिखर पायथ्याची सरस्वती असा हा प्रयागच आहे असे तुकोबांनी या स्थानाचे वर्णन केले आहे. नुकतेच राज्यशासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

संगम स्थानावरुन नदीकाठाने येताना नीरा नदीचे भव्य पात्र व त्याचे अलीकडील उंच कडे रौद्र स्वरुपाने आपले लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर पलीकडील तीरावरील किल्याप्रमाणे तटबंदी असलेले नृसिंह मंदिर, मंदिराचे उत्तुंग शिखर आणि मंदिरालगतचा नीरा नदीवरील विस्तीर्ण घाट यावर आपली नजर खिळून राहाते. एखाद्या चित्रकलावंतास रस्त्यावर थांबून या लोभस दृश्यास रंगबद्ध करण्याच्या मोह झाल्याशिवाय राहणार नाही.

Share: