वेध स्मार्ट सिटीचे

स्मार्ट सिटीतून नाईट मार्केटची संकल्पना आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याचे नियोजन आहे. इंदिरा गांधी स्टेडीयम येथे विविध खेळांचे मैदान करण्यात येणार आहे. शहरासाठी महत्त्वाची असलेल्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी स्मार्ट सिटी कंपनीने 200 कोटी रुपयांंची तरतूद केली आहे. त्यासह एनटीपीसी व शासनाच्या मदतीने 110 एमएलडीचे समांतर जलवाहिनी घालण्यात येणार आहे.

एखादा ध्येयहीन मनुष्य 10 हजार चुका करत असेल आणि त्याला ध्येय मिळाले तर तो केवळ 100 चुका करतो, असे वचन स्वामी विवेकानंद यांचे आहे. पंतप्रधानपदी असलेल्या श्री. नरेंद्र मोदी यांच्या यशाचे गमक हेच आहे. समाजाला प्रेरणा देणे आणि प्रामाणिकपणे काही करू इच्छिणार्‍यांना ध्येय देणे, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. आणि याच पद्धतीतून त्यांनी समोर आणलेली योजना म्हणजे ङ्गस्मार्ट सिटीफ. व्यापक जनसहभागातून स्मार्ट सिटी संकल्पना विकसित करण्याची कार्यपद्धती अफलातून होती आणि यात सोलापूरकरांनी मजल मारली.

स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात सोलापूरचे नाव झळकले. तत्कालीन नगरविकास मंत्री व्यंक्कय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली.

योजनेचा व्याप पाहता आणि त्यातील जनसहभाग पाहता प्रत्यक्ष काम सुरू होण्यास काही वेळ लागणे स्वाभाविकच होते. आता कामे सुरू झाली आहेत. शहरात त्याचा काही अंशी प्रभाव दिसायला सुरुवातही झाली आहे. या योजनेअंतर्गत सोलापूरसाठी 350 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 25 कोटी रुपये खर्च केले आहे. स्मार्ट सिटीतील कामे संथ गतीने होत असली तरी दमदार आणि दर्जेदार पद्धतीने होत असल्याचा अनुभव येत आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाल्याचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत. काही भागात रोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग सुरू आहे. या योजनेतील चांगली बाब म्हणजे सोलापूरकरांना स्मार्ट सिटीअंतर्गत कोणती कामे हवी आहेत, हे ध्यानात घेऊनच योजना पुढे सरकत आहे.लोकमानसही सकारात्मक झाल्याचे दिसत आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्मार्ट सिटी योजनेचा पाया रचला. त्यानंतर पुढील काम महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी नियोजनद्धपणे केंद्र सरकारच्या निकषानुसार प्रस्ताव सादर केला. राज्य शासनाने प्रथम टप्प्यात सोलापूर शहराची शिफारस केंद्र सरकारकडे केली आणि पहिल्या यादीत सोलापूरसह पुण्याचे नाव जाहीर करण्यात आले.

पाच वर्षांसाठी 1250 कोटींची ही योजना आहे. या रकमेतून काय काम करायचे हे प्रस्तावात ठरलेले आहे. महापालिकेने अनेक योजना सादर केल्या. नाईट मार्केट, सिद्धेश्वर मंदिर परिसराचा विकास, रस्ते, पुरातन वास्तू विकास आदी कामांचा त्यात समावेश होते. त्यानुसार काम करण्यास टप्प्याटप्प्याने निधी देण्याची तयारी केंद्र सरकारने केली. स्मार्ट सिटीची कामे करताना सुरुवातीला क्षेत्र निश्चित केले. त्यासाठी नागरिकांची मते मागवली. सिद्धेश्वर मंदिर परिसरासह 1024 एकराचा परिसर या योजनेत आहे. त्यात ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर, महापालिका, रेल्वे स्टेशन, इंदिरा गांधी स्टेडीयम, हुतात्मा बाग, डॉ. कोटणीस स्मारक, शासकीय कार्यालय आदींचा समावेश आहे. स्मार्ट सिटीच्या कामास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता, रंगभवन चौक सुशोभीकरण, ईपॉस मशीन, स्मार्ट शौचालये आदींचा यात समावेश आहे.

आता काय परिस्थिती

रंगभवन ते डॉ. आंबेडकर चौकपर्यंत 1.2 किमी रस्ता 22 कोटी रुपये खर्च करुन करण्यात येत आहे. मागील वर्षापासून काम सुरू आहे. जानेवारीपर्यंत रस्ता पूर्ण होण्याची शक्यता आहे. रंगभवन चौक सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यासाठी 12 कोटीचा निधी आहे. चौकातील सुशोभिकरणास्तव इतकी मोठीरक्कम खर्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो चौक अत्याधुनिक असणार आहे. सौर ऊर्जेचा वापर असेल. एलईडी स्क्रीन तेथे असणार आहे. होम मैदान येथे तीन कोटी रूपये खर्चून हरित पट्टा निर्माण करण्यात येत आहे. याशिवाय महापालिकेचे उद्यान कार्यालय व हुतात्मा उद्यान विकसीत करण्यात येत आहे. शहरातील बागा म्हणजे लहान मुलांचे आकर्षण असणार आहे.

काय झाले

स्मार्ट सिटी योजनेतून शहराचे महत्त्व सांगणारे ईपॉस मशीन महापालिका आवार, बस स्थानक येथे बसवण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेतून 130 घंटागाड्या घेऊन घनकचरा व्यवस्थापन सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरात डोअर टू डोअर घंटागाड्या पोहचून कचरा संकलित करत आहेत. परिणामी शहरात रस्त्यावर पडणारा कचरा बंद झाला. घरात कचरा संकलनासाठी ओला व सुका कचर्‍यांचे डबे प्रत्येक मिळकतदारांना देण्यात आले. सोलर पॅनल बसवण्यात आले.

Share: