सोलापुरी भोजनात मानाचे पान हुग्गी

महाराष्ट्र - कर्नाटक - सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः सोलापुरात या हुग्गीला एक महत्त्वाचं स्थान आहे. लिंगायतांच्या घरांमधली लग्नं हुग्गीशिवाय पूर्ण होत नाहीत. पंगतीत पत्रावळीवर हुग्गी, त्यावर तुपाची धार, भात, आमटी आणि वांग्याची भाजी हा बेत केला नाही तर लग्न अपूर्ण राहिल्यासारखं अनेकांना वाटतं.

ङ्गहुग्गीफ हे खास कर्नाटकी नाव. महाराष्ट्रात याला गव्हाची खीर म्हणतात. आधल्या दिवशी अस्सल जोडगहू भिजवले जातात. अलवार हाताने सडले जातात. नंतर त्यात गूळ, खोबरे, खसखस, जायफळ, बेदाणे किंवा आवडीनुसार काजू बदामही घातले जातात. प्रत्येक मोठ्या सणाला महापक्वान्न म्हणून हुग्गी सोलापुरी भोजनात मानाचे पान होय.या हुग्गीवर, दूध व लोणकढे तूप घेऊन भुरके ओढत खाणे हा एक खवय्यांचा जिव्हासिद्ध लज्जतदार अधिकारच होय.

महाराष्ट्र आणि कर्नाटकी सीमावाद या हुग्गीने शेकडो वर्षांपासून पुसून टाकलाय. हुग्गी न चाखणारा सोलापूरचा पाहुणा उपाशीच राहिला! असेही समजायला हरकत नाही. एवढा हा प्रकार लोकप्रिय आहे. एकूणच सोलापुरात येऊन हटकून व हट्टाने जिभेचे लाड पुरवावेत असे हे पदार्थ ही सोलापूरची खासीयत होय..

चला तर.. या सोलापूरला आणि चाखा ! मस्त शेंगाचटणी, कडक भाकरी, शेंगापोळी, बाजार आमटी, चारूबुवा, इडली-सांबर आणि हुग्गी !  हे सात पदार्थ चाखल्यानंतर सप्तस्वर्ग जिभेवर नक्कीच अवतरतील ! याचा खवय्यांनी जरूर अनुभव घ्यायला हवा असाच आहे..

Share: