अग्निहोत्राचे उगमस्थान शिवपुरी आश्रम

शिवपुरी हे अग्निहोत्राचे उगमस्थान मानले गेले आहे. वैदिक जीवनपद्धतीद्वारे समस्त भूमंडलावर सुखसमृद्धी आणि शांती प्रस्थापित व्हावी अशी अग्निहोत्रामागची मूळ संकल्पना आहे. भारतासह जगातील 70 देशांमध्ये अग्निहोत्राचा प्रसार झालेला आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज पीठाचे अधिष्ठान लाभलेल्या श्री गजानन महाराज यांनी वायुमंडल शुध्दीसाठी अग्निहोत्र यज्ञाचे पुनरुज्जीवन केले. अक्कलकोटमधील शिवपुरीच्या अग्निहोत्र यज्ञाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. अग्निहोत्र प्रसार आणि संशोधन कार्याबरोबरच शिवपुरीत आयुर्वेदिक शास्त्रीय पंचकर्म केंद्र, अन्नदान, गो संवर्धन, मोफत आरोग्य शिबिर आदी चालते. येथे श्री गजानन महाराज समाधी, शिवालय आणि भगवान परशुरामाचे मंदिर यांचे दर्शन लाभते.

शिवपुरी येथील पवित्र वातावरणात येणार्‍या पर्यटक व भक्तांची वाढती संख्या ध्यानात घेऊन निवासासाठी इको हाऊस उभारण्यात आले आहेत, याच्या निर्मितीसाठी सौर उर्जा आणि नैसर्गिक वस्तूंचा म्हणजे माती, चुना, काकवी, गोमय अशा वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. येथे अग्निहोत्र पद्धतीने व नैसर्गिक पद्धातीने शेती केली जाते. येथील नक्षत्र वनात आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींचे संवर्धन व संगोपन केले जाते. अग्निहोत्र तसेच आयुर्वेदिक पंचकर्म उपचारासाठी जगभरातील साधक या ठिकाणी येतात. दरवर्षी शिवपुरीत कायरोप्राक्टिक या अमेरिकेतील प्रसिद्ध उपचारपद्धतीचे शिबिर आयोजित केले जाते आणि त्यासाठी परदेशातून तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित असते. यामध्ये स्नायू, सांधे, हाडांचे आणि मणक्यांचे विकार यावर उपचार केले जातात. ही एक विनाऔषध उपचारपद्धती आहे.

Share: