पद्मशाली समाजाने सोलापूरला ओळख दिली

सोलापूर शहरात पूर्वी कापड गिरण्याच होत्या. त्यामुळे या शहराला गिरणगाव हेच नाव पडले होते. येथील गिरण्यांचे भोंगे क्षीण झाले. त्यातील कामगार बाहेर फेकला गेला. बकाल चाळीच उरल्या. अशा स्थितीत पूर्वभागातील तेलुगु भाषिकांनी प्रामुख्याने पद्मशाली समाजाने सोलापूरला सावरले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण या गिरण्यांतील यंत्रे घेऊन त्यांनी यंत्रमाग सुरू केले.

पूर्वभागातील हातमागांचे रूपांतर यंत्रमागात झाले. साड्या, धोतराच्या ठिकाणी चादर, टॉवेल, नॅपकीनचे उत्पादन सुरू झाले. ही नावीन्यपूर्ण उत्पादने सातासमुद्रापार गेली अन् जगाच्या नकाशावर सोलापूरचे नाव आले. सोलापुरी चादर अशी ओळख देशात निर्माण झाली. त्यानंतर याच समाजाने सहकारातून समृद्धी आणली होती.

सूत गिरण्या, बँका, रुग्णालये सुरू केली. हजारोंना रोजगार पुरवला. विजापूर वेशीतून सिद्धेश्वर मंदिराकडे जाताना उजव्या बाजूस पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत श्री मार्कंडेय महामुनींचे मंदिर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मार्कंडेय जन्मोत्सवाचा उत्साह असतो. शहराच्या पूर्व भागासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो.

Share: