पंढरपूर

पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव 'पंडरगे' असे आहे.

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठीसंपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. [२].हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचादेव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.

इतिहास

पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा प् मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो.डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी नव्याने उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे स्नुमान करता येते की,शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. 'स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा 'लानमडू' हळूहळू वाढत गेला. शके ११५९ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला.शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेवून या देवळाची वाढ केली.आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली.देवळाचा विस्तार शके १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाला.[३]पंढरपूरला दक्षिण कशी असे म्हणतात. विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला, अशी ही कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्तही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. आणि कर्नाटकाचे पक्वान्न ‘पुरणपोळी’च विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते.

चंद्रभागा

भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणार्‍यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सति, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बर्‍यच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.

भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे.पुणे, पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूर पर्यंत अनेक साखर कारखाने आपलं दूषित पाणी या नदीच्या पत्रामध्ये सोडतात त्यामुळे हे पाणी प्रदूषित होत आहे. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने 'नमामि चंद्रभागा अभियान' हाती घेतलं आहे. यामध्ये भीमाशंकरपासून ते रायचूर पर्यत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत त्याच बरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी ,स्वछता ,नदी काठी वृक्ष लागवड अश्या गोष्टवर भर देण्यात येणार आहे यामुळे नदीचे रूप पालटण्याचा प्रयत्न आहे.अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे.

तीर्थक्षेत्र

पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघीकार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणार्‍या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.

Share: