लोकसहभागातून गावविकास- गावदौरा भेट


सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व गावे समृद्ध आणि विकसित व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन सतत प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन विविध गावांना भेटी दिल्या जातात आणि गावातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात. याच उद्देशाने सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे मार्डीपासून 3 कि.मी अंतरावर असणारे उत्तर सोलापुरातील सेवालाल नगर येथे गावविकास अभियानाची बैठक घेण्यात आली. सेवालाल नगर हे साधारण 600 लोकसंख्या असणारे गाव आहे. गावात एकूण 150 कुटूंब आहेत. संपूर्ण गाव हे एकच समाज, एकच बोलीभाषा असणारे गाव आहे. लमाण समाज संपूर्ण गावात आहे.

भौगोलिकदृष्ट्या बघितले तर उत्तर सोलापुरातील हे शेवटचे गाव. या गावानंतर मराठवाडा सुरु होतो. पश्चिम महाराष्ट्रातील या गावाच्या दोन्ही बाजूला पाण्याचे साठे आहेत. पण गावाला पाणी नाही. इकडे उजनी आणि पलीकडे हिप्परगा हे जलसाठे असूनही गावात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. गावाने चर, बंधारे खणले आहेत पण त्यात पाणी साठेल एवढा पाऊसच पडला नाही. त्यामुळे गाव दुष्काळग्रस्त आहे. गावाकडे येणारा दिड किलोमीटर रस्ता खराब आहे. त्याचे डांबरीकरण व्हावे. पण सेवालाल नगरकडे येणारा रस्ता खराब आहे. गावात युवकांची संख्या आहे. ते सुशिक्षित बेकार आहेत. कामगार म्हणून काम करण्याची क्षमता (शारीरिकदृष्ट्या सक्षम) ही या तरुणांत आहे. परंतु तरुणांना काम नाही. हातभट्टी, दारु व्यवसाय हा परंपरागत व्यवसाय गावात आहे. शेती व्यवसाय ही येथे मुख्य व्यवसाय आहे. ज्वारी, ऊस ही मुख्य पीके येथे घेतली जातात. गावात गावठाण क्षेत्र असून ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच, ग्रामसेवक यांनी या गावठाण जमिनीवर उद्योग, इमारत उभी करुन घ्यावी असा प्रस्ताव मांडला आहे. गावात रोजगार हमी योजना चालत नाही. फुलांचे उत्पन्न ही शेतजमीन असणार्‍या शेतकरी करत आहेत.

गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. डिजिटल शाळेच्या माध्यमातून गावातील मुले गावातच शिक्षण घेतात. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत अ‍ॅक्वा पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. गावात दुर्गादेवी मंदिर आहे. गावात दुर्गादेवी ट्रस्ट स्थापन केला असून दिवाळीमध्ये गावात मोठी यात्रा भरते. बाहेरुन समाजबांधव यात्रेसाठी येतात. या वेळी वेगवेगळे सामाजिक उपक्रम जसे की रक्तदान शिबीर घेतले जाते. त्याचबरोबर सेवालाल जयंती, हनुमान जयंती व होळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. गावात अंगणवाडी आहे. आरोग्यसेविका येते. गावातून कोणीही उच्चशिक्षित नाही. आता मुले शिकत आहेत. एकंदर बैठकीत गावातील समस्या, रोजगार, तीर्थक्षेत्र विकास, शिक्षण, विकासाभिमुख कामे, आरोग्य, मनोरंजन, शुद्ध पाणी, दुष्काळ निवारण, सेवा आदी मुद्यांवर चर्चा झाली.

Share: