दीर्घकाळ ऊब देणारी सोलापूरची चादर

चादरीचा शोध सोलापुरातच लागला. कै. किसनराव क्षीरसागर यांनी घरातच जेकॉर्ड बनवले. त्याचे जाळे विणून त्यातून चादरीची वीण (ताना-बाना) घट्ट केली.

सोलापूरची आठवण कायम राहील, असे काही द्यायचे असेल तर सोलापुरी चादर देतात. ती दीर्घकाळ उब देणारी आहे. कारण त्याची वीणच इतकी घट्ट की, फाटता फाटणार नाही. डबलपेटी जेकॉर्ड चादर कमीत कमी 15 वर्षे टिकते. 1300 ग्रॅम वजनाची ही चादर मोहक दिसते. मयूरपंखी डिझाइन तर सर्वांनाच हवीहवीशी वाटते.

चादरीचा शोध सोलापुरातच लागला. कै. किसनराव क्षीरसागर यांनी घरातच जेकॉर्ड बनवले. त्याचे जाळे विणून त्यातून चादरीची वीण (ताना-बाना) घट्ट केली. त्यांच्या पश्चात आता रंगण्णा क्षीरसागर आणि त्यांची मुले अशी तिसरी पिढी या या उत्पादनात आहे.  सोलापुरी चादरीत काळानुरूप बदल घडून आले नाहीत. त्यामुळे त्याचे पारंपरिक स्वरूप अजूनही टिकून असल्याचे दिसून येते. या चादरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के कॉटन. 20 सिंगल या सुताचे डब्लिंग केले जाते. म्हणजे त्याचे दोन कोन लावून डब्लिंग मशीनवर एक धागा तयार केला जातो. नक्षीकामानुसार रंग निवडून हा धागा रंगवतात. उत्पादनपूर्व काही प्रक्रिया झाल्या, की हे धागे यंत्रमागांवर येतात. खाली आणि वर असे दोन नक्षीकाम असल्याने 20 सिंगल या धाग्याचे चौपट थर या विणकामात एक होतात. त्यामुळे ही वीण घट्ट होते. दीर्घकाळ टिकून राहते. बाजारपेठेतील स्पर्धेत सोलापुरी चादरींपुढे इतर प्रांतातील काही चादरी आल्या. प्रामुख्याने पानिपत येथून लाइटवेट चादरी. त्या वजनाने हलक्या अन् घडी घातली की लहान होतात. परंतु त्याचा धागा पर्यावरणपूरक नाही. सिंथेटिक यार्नपासून याची निर्मिती होते. जे आरोग्यालाही घातक असते. त्यामुळे सोलापुरी चादरीची क्रेझ टिकून राहिली. या चादरी दीर्घकाळ टिकत असल्याने बाजारपेठेतील क्रयशक्तीही मंद असते. त्यामुळे उत्पादनात नेहमीच मंदी असते. परंतु आलेल्या पाहुण्यांचे स्वागत याच चादरीने होत असल्याने त्याची बाजारपेठ स्थिर राहिली, हे नाकारून चालणार नाही.

रोज 50 हजार चादरी येतात बाजारात

शहराच्या पूर्वभागात एकूण 15 हजार यंत्रमागांवर उत्पादने घेतली जातात. त्यात टेरिटॉवेल, नॅपकीनचा समावेश आहे. 15 पैकी 4 हजार यंत्रमागांवर चादरीचे उत्पादन आहे. त्यात सुमारे 10 हजार कामगारांची उपजीविका चालते. डब्लिंग, रंगणी, रिलिंग, वार्पिंग आणि सायझिंग असे टप्पे पार करत चादर तयार होत असते. दररोज 50 हजार चादरी बाजारात येतात.

गारमेंट हबकडे वाटचाल

सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने गेल्या तीन वर्षात उत्पादन क्षेत्रात मोठा कायापालट केला आहे. गणवेशसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन प्रदर्शने भरवून सोलापूरचे नाव जगाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाला. त्याची परिणती म्हणजे परदेशातून मागणी येण्यास सुरुवात झाली. डिजिटल मार्केटमध्ये स्वतंत्र स्थान मिळवले. आफ्रिका खंडातील काही देशांशी करार झाले. तेथील व्यापार्‍यांच्या तोंडी सोलापूर हे नाव आले. या सर्व घटना-घडामोडींमध्ये सोलापूरची वाटचाल गारमेंट हब होण्याकडे सुरू आहे. यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले. मफतलाल, बिर्लासारख्या मोठ्या कंपन्या गुंतवणुकीसाठी सोलापुरात उतरल्या. त्यामुळे गणवेश उत्पादनात सोलापूरचे नाव आता जगाच्या पटलावर येत आहे.

1800 कोटींचा हिस्सेदार

गणवेश उत्पादनात वार्षिक 1800 कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यात सोलापूरचा शिरकाव होत असून, 1800 पैकी 500 कोटींची उलाढाल झाली पाहिजे, असे उद्दिष्ट घेऊन कामाला सुरुवात झाली. अर्थातच यात तरुणांनी पुढाकार घेतला. संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू यांचे वय ऐंशीच्या घरात. त्यांना घरात बसू न देता, या तरुणांनी त्यांना घेऊनच डिजिटल मार्केट सुरू केले. स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित केले. जगभरात उत्पादने पुरवण्यास सुरुवात केली. त्यांचे यश पाहून यंत्रमागधारकांनीही त्यांच्या मागे जाण्याचे ठरवले. त्यांनीही पंचतारांकित हॉटेलमध्ये हजेरी लावून स्वत:चे स्थान निश्चित करण्यासाठी डिजिटल मार्केटच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे.

Share: