सोलापूरची कडक भाकरी

संक्रांतीच्या दिवसात वेळ अमावास्या हा एक अतिशय आगळावेगळा सण साजरा केला जातो. घरात वेगवेगळे खाण्याचे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ बनवायचे आणि शेतात सामूहिक भोजनासाठी जायचे. या सणाचे नाव वेळ अमावास्या. अख्खा गाव आपापल्या शेतात असतो. शहरात स्थायिक झालेली मंडळी यानिमित्ताने हमखास गावाकडे जातात.

एखादं गाव, एखादे शहर, एखादा जिल्हा तेथील पर्वतशिखरे, झरे, नद्या, वृक्षवेली अशा नैसर्गिक वरदानाची सुंदर वस्त्रे लेवून सजलेला असतो. ती त्या प्रदेशाची वेगळी ओळख असते. अशी कोणतीही नैसर्गिक श्रीमंती लाभलेली नसतानाही बोरी-बाभळींचा सोलापूर जिल्हा सर्वत्र प्रसिद्ध व्हावा इतकी उद्योगविश्वातील व खाद्यविश्वातील विविधता सोलापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. ही ओळख येथील दुष्काळाशी झुंजणार्‍या माळरानाने कमावली आहे, हे नक्की !

चादर आणि टॉवेल म्हटले की ती सोलापुरीच! तसेच भाकरी नि शेंगाचटणी म्हटले की ती सोलापुरीच !! असेच बोलले जाते. सोलापुरी शेंगाचटणी आणि ज्वारी, बाजरीच्या कडक भाकरींचा आस्वाद घेण्यासाठी अनेक देशीविदेशी पाहुणे नेहमीच आसुसलेले असतात. खवय्यांचा रवय्या पुरविण्यासाठी लसणाची खमंग शेंगाचटणी. उपवासालाही चालणारी चटणीही मिळते. अशा बिनलसणाच्या दाणेदार, लज्जतदार, चटकदार शेंगाचटणीचे बखाणे भरण्यासाठी सोलापूरला येण्याचे बहाणेच पुरे !! चटकदार खाणार त्याला सोलापूर देणार.. हा बाज येथील खाद्यविश्वातील उद्योजक खवय्यांच्या थेट रक्तातच भिनवतात. शेंगाचटणी, ज्वारी-बाजरी-नाचणीची कडक भाकर, जोडीला कच्चा कांदा आणि थोडीशी जीभ भाजवायला अस्सल हिरव्या मिरचीचा फोडणीचा  झणझणीत ठेचा..!  असा फक्कडसा मेनू सोलापुरात येऊन नक्की चाखायला हवा.

Share: