चवप्रिय चारूबुवा

पूर्वभागातील तेलुगु भाषिकांचे प्रमुख अन्न भात. त्याच्यासोबत चारू नसेल तरच नवल. हा चारू इतका लोकप्रिय झाला की, बाहेरून येणारी मंडळी पूर्वभागातील चारू आवर्जून मागतात. चारू म्हणजे आमटी. तुरीपासून ती बनवली जाते. दाळ चांगल्या पद्धतीने शिजली की, रवीने घुसळतात. त्यात चिंचेेचे पाणी घालून पुन्हा एक उखळी फुटू देतात. त्यानंतर खमंग मसाल्याची फोडणी असते. झालं, चारू तयार. खरे पाहता, हे गरिबाघरचे. पण त्याचे मार्केटिंग असे झाले की त्याला प्रतिष्ठा मिळाली. नाश्त्यासाठी शहरात विविध ठिकाणी ङ्गदाल-चावलफच्या गाड्या सुरू झाल्या. मसालेभातासोबत चारू घेतले की, दुपारच्या जेवणाची आठवणही होणार नाही. चवीसाठी कैरीच्या लोणच्याची फोड असेल तर व्वा, नुसते वाचून, ऐकूनच तोंडाला पाणी सुटते.

तिरूमलाई येथे याला अन्नम् सारम्  असेही म्हणतात.  तेलुगु भाषिकांचे अन्न पूर्णब्रम्ह आहे. यातील बुवा म्हणजे सारम् बनविण्याची हातोटी पाककुशलतेचे प्रतीक होय. उपलब्ध पालेभाज्या किंवा फळभाज्यांचा कीस करून त्यात ओले खोबरे, बदाम, काजू, चवीनुसार चिंचगुळाचा कोळ घातला जातो. कोणत्या भाज्या किती प्रमाणात घ्यायच्या? ते उपलब्धतेनुसार कुशल पाककलाकार किंवा सुगरणच ठरवू शकते. पांढरा भात किंवा मसालेभातावर हा रस्सा ओतून घेऊन चवीने खाणे हा अनुभव निश्चित घेण्यासारखा आहे. भूक नसतानाही किमान नारळाएवढा चारू व किमान अर्धापावलिटर बुवा सहजपणे कोणीही खाईल एवढी लज्जत या चारूबुवाला नक्कीच आहे.

सोलापूर आंध्र व कर्नाटक सीमालगत जिल्हा. त्यामुळे प्रांतीय सीमारेषा ओलांडून येथे तेलुगु भाषिकांचा मेनू ङ्गचारूबुवाफ व कर्नाटकी इडली हे दोन पदार्थही येथील खाद्यसंस्कृतीत कायम रुजलेले आहेत.

सोलापूरकर हे भाकरी आणि संबंधित पदार्थ बनवण्यातही खूप पुढे आहेत. दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यांत, तसेच सोलापूर शहरातही खासकरून कन्नड भाषिकांमध्ये पुरीसारखी टम्म फुगलेली भाकरी बनवली जाते. ती कडक केल्यानंतर आणखी चवदार लागते. कागदासारखी भाकरी आणि सोबत शेंगा चटणी आणि दही असले म्हणजे आणखी काय हवं. ही चव एकदा चाखलीच पाहिजे.

Share: