श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. याच झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करीत व उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंटप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची (प्रसादाची) व्यवस्था आहे.

स्वामी समर्थांचा मंत्र : भिऊ नको,मी तुझ्या पाठीशी आहे

सोलापूर शहरापासून 40 किमी अंतरावर असलेले अक्कलकोट शहर श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दत्तात्रयाचे अवतार मानले गेलेल्या समर्थांचा एकूण कार्यकाळ 40 वर्षांचा आहे. त्यापैकी 21 वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते.

महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भक्तांची या ठिकाणी कायम वर्दळ असते. महाराष्ट्रतील प्रामुख्याने पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, नाशिक व संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील भक्तसंख्या प्रामुख्याने जास्ती आहे. स्वामी समर्थ ज्या वडाच्या झाडाखाली बसून ध्यानधारणा करत त्या ठिकाणी आता मंदिर बांधण्यात आले आहे. त्याला वटवृक्ष देवस्थान म्हणून ओळखले जाते. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे शिष्य श्री चोळप्पा यांच्या घरात आहे. हे ठिकाण समाधीमठ म्हणूनओळखले जाते.

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने रोज दुपारी व रात्री हजारो लोक प्रसादाचा लाभ घेतात. देवस्थान आणि अन्नछत्र मंडळाकडून दोन भक्तनिवासांची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

Share: