सोलापूर : गुंतवणुकीसाठी नेक्स्ट डेस्टिनेशन

सोलापूर जिल्ह्यातून पुणे-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 जातो. तसेच सोलापूर-विजापूर-मंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 आणि सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र.211 जातो. रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.204 ही सोलापूर जिल्ह्यातून जातो. सिकंदराबाद सोलापूर महामार्ग प्रस्तावित आहे.

पुणे, मुंंबईवर झालेला अतिरिक्त ताण पाहता आगामी काळात नवीन उद्योगांसाठी सोलापूर शहरच निवडावे लागणार आहे. सोलापूरचे अनुकूल वातावरण, उपलब्ध मुबलक मनुष्यबळ, मोकळी जमीन, दळणवळणासाठी सर्व प्रमुख शहरांना जोडले गेलेले रस्ते आणि दक्षिण भारत व उत्तर भारतास जोडली गेलेली रेल्वेसेवा ही सोलापूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.

वाहतूक सेवा अधिक गतीने होण्यासाठी सोलापूरला जोडले गेलेले सर्व महामार्ग चौपदरीकरणाच्या अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींचे काम येत्या एक-दोन वर्षात मार्गी लागणार आहे. यामध्ये सोलापूर-मुंबई, सोलापूर-धुळे या महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे,  सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे तर सोलापूर-सांगली, सोलापूर-विजयपूर, सोलापूर-अफजलपूर या महामार्गांचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन वर्षांत दळणवळण सेवा आणखी वेगवान होण्यास मदत होणार आहे. उडान योजनेंतर्गत डिसेंबर महिन्यापासून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. भविष्याचा विचार करूनच सोलापूरपासून 15 कि.मी. अंतरावर नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा संपादित केली आहे. कुंभारी येथे नवीन औद्योगिक वसाहत, मेगा क्लस्टर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

भौगोलिक स्थान : सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पूर्वेला आहे आणि संपूर्णपणे भीमा आणि सीना नदीच्या खोर्‍यामध्ये आहे. संपूर्ण जिल्हा भीमा व तिच्या उपनद्या यांच्याद्वारे पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा होतो. जिल्ह्याच्या उत्तरेला नगर आणि धाराशिव जिल्हा, पूर्वेस धााराशिव आणि कलबुर्गी (कर्नाटक राज्य), दक्षिणेला सांगली आणि विजयपूर (कर्नाटक राज्य) व पश्चिमेला सातारा आणि पुणे जिल्हा आहे. बार्शी तालुक्याच्या उत्तरेस बालाघाट पर्वत रांगेचा काही भाग दक्षिणेकडे काही किमी पर्यंत जातो. करमाळा, माढा आणि माळशिरस तालुक्यांमध्ये विखुरलेल्या पर्वतरांगा आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा भूभाग जवळपास सपाट पातळीवर आहे.

जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 14844.60 चौ किमी असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 338.80  चौ किमी (2.28 टक्के) शहरी आणि राहिलेले 4505.80 चौ किमी (97.72 टक्के) हे ग्रामीण आहे. क्षेत्रफळानुसार करमाळा हा सर्वात मोठा तालुका तर उत्तर सोलापूर हा सर्वात लहान तालुका आहे.

एकेकाळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गिरणगाव म्हणजे सोलापूर जिल्हा गुंतवणूकदारांसाठी भविष्यकाळात सुवर्णसंधी ठरणार आहे. मागील पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे व राज्य शासनाने आखलेले औद्योगिक धोरण पाहता सोलापूर पुणे, मुंबईनंतर उद्योजकांसठी नेक्स्ट डेस्टिनेशनच ठरणार आहे.

सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत.

मुंबई -चेन्नई, सोलापूर - विजापूर व मिरज - लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत.

कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्वर, बंगळुरू, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत.

Share: