भूलोकीचे वैकुंठ : पंढरपूर

पायी केल्या जाणार्‍या पंढरीची वारी परंपरा किमान 1 हजार वर्षे जुनी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात विठ्ठल मंदिर आहे. 900 वर्षांपूर्वी एक वारकरी दाम्पत्य शिवयोगी सिद्धराम  यांना भेटल्याचा संदर्भ या मंदिराला आहे.

पंढरपूरला दक्षिणेची काशी म्हटले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांतून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात. आषाढी, कार्तिकी, माघी  आणि चैत्री अशा पंढरपूरच्या चार यात्रा प्रसिद्ध आहेत. पहिल्या शतकापासून ते अस्तित्वात आहे असे मानले जाते. पंढरपुरात विठ्ठल टेकडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या उंचावरच्या भागात हे पुरातन मंदिर आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य संतांचे आराध्यदैवत असलेल्या या विठ्ठलाची मूर्ती या मंदिरात आहे. हे तीर्थक्षेत्र भीमा नदीच्या काठावर आहे. पण पंढरपुरात आली म्हणजे ही भीमानदी चंद्रकोरीचा आकार धारण करते म्हणून तिला येथे चंद्रभागा म्हटले जाते.

श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे, पण तो भक्त पुंडलिकाच्या हट्टापायी स्वत: पंढरपुरात येऊन अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा आहे. देवाला पंढरपुरात येता येत नव्हते पण रुसून निघून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव येथे आला अशी आख्यायिका आहे. या मंदिरात विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र नाही. या मंदिराच्या समोर असलेल्या वाळवंंटात अनेक संतांनी कीर्तने केलेली आहेत आणि येथेच तेराव्या शतकात महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक क्रांतीची पहिली पावले उमटली आहेत.

पंढरपूर हे सोलापूरपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. पंढरपूरला येण्यासाठी आख्या महाराष्ट्रातून बसगाड्या आहेत. ते रेल्वेने कुर्डुवाडीला जोडले गेलेले आहे. कुर्डुवाडी हे स्थानक मुंबई-पुणे-सोलापूर-चेन्नई या मार्गावर असल्याने उत्तरेतून आणि दक्षिणेतून कोठूनही आधी कुर्डुवाडीला आणि नंतर पंढरपूरला रेल्वेने येता येते. शहर आणि परिसरात अन्यही मंदिरे आहेत. गोपाळपूर येथील मंदिर पुरातन आहे.गावातच कैकाडी महाराजांच्या मठात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी शिल्पसृष्टी आहे. ही शिल्पसृष्टी आता पर्यटकांंचे आकर्षण ठरली आहे.

Share: