विविधतेने समृद्ध असणारा सोलापूर जिल्हा
महाराष्ट्राच्या दक्षिणेस असणारा एक प्रमुख जिल्हा - सोलापूर जिल्हा.
वेगवेगळ्या कालखंडात चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी राजवटीखाली असणारा सोलापूर जिल्हा इ.स. १९६० मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून उदयास आला. अनेक संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या जिल्ह्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. अगत्य, साधेपणा, मनमोकळेपणा, पारंपारिकता हे इथल्या मातीचे विशेष गुण. कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असणार्या या जिल्ह्यामध्ये मराठी बरोबर कन्नड व तेलुगू भाषाही काही प्रमाणात बोलल्या जातात. संपन्न असा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला हा जिल्हा खाद्यसंस्कृती, कापडउद्योग व विशिष्ट शेती उत्पादनांसाठीही जगप्रसिद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी म्हणजे भीमा. पंढरपुरात तिला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर सीना आणि माण या नद्याही येथून वाहतात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये भीमा नदीवर बांधलेले उजनी हे मोठे धरण सोलापूर जिल्ह्यास पाणीपुरवठा करते. धरणामुळे निर्माण झालेल्या मोठ्या जलाशयास यशवंतसागर या नावाने ओळखले जाते. या जलाशयावर येणारे हंगामी पक्षी 'फ्लेमिंगो' पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात. नदी जोड प्रकल्पाअंतर्गत भीमा व सीना या दोन नद्या जोडणारा २१ किलोमीटर लांबीचा बोगदा हा या प्रकारचा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे. उजनी धरण, बॅकवॉटर आणि या जोडकालव्याच्या पाण्यामुळे जिल्ह्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उसाचे मोठे उत्पादन असल्यामुळे सोलापूर जिल्हा सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा ठरला आहे.


धार्मिक महत्व
सोलापूर जिल्ह्याला लाभला आहे अनेक दैवतांचा आशीर्वाद. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, महाराष्ट्राचे कुलदैवत असणारा पंढरपूरचा विठोबा, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, तुळजापूर, गाणगापूर, बार्शीचे श्री भगवंत मंदिर, करमाळ्याची कमला देवी अशी अनेक देवस्थाने व शिवपुरी येथील अग्निहोत्रामुळे ही भूमी पावन व मंगल झाली आहे.

ऐतिहासिक वारसा
चार बलदंड बुरूज, मजबूत दुहेरी तटबंदीचा भुईकोट किल्ला म्हणजे सोलापूरचे वैभव आहे. तर आपल्याला थेट पुराणकाळात घेऊन जातो, अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण असणारा नळदुर्ग किल्ला. तसेच हत्तरसंग कुडलचा 'मराठी भाषेतला पहिला शिलालेख', करमाळ्याची ९६ पायर्यांची विहीर अशा अनेक इतिहासकालीन वास्तू सोलापूर जिल्ह्याची शान आहेत.

खाद्यउत्पादने
दर्जेदार व भरपूर प्रमाणात होणार्या ज्वारीच्या उत्पादनामुळे सोलापूर जिल्हा 'ज्वारीचे कोठार' म्हणून ओळखला जातो. तूर, मूग, भुईमूग या शेती उत्पादनांसह येथे डाळिंब, द्राक्षे, सीताफळ या फळांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उत्तम प्रतीच्या कांद्याचे पिकही सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
फोटो गॅलरी
पाहूया एक झलक सोलापूर जिल्ह्याची....