द्राक्ष व बेदाणा : 1 लाख रोजगार, 900 कोटींची उलाढाल

नाशिक, सांगलीपाठोपाठ आता द्राक्ष उत्पादनात जिल्ह्याची कमान चढती आहे. ऊस, डाळिंबानंतर जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र वाढत चालल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, मोहोळ, माढा, माळशिरस, करमाळा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत.

सोलापूर जिल्हा हा अलीकडे फलोत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही नवी ओळख निर्माण होण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे श्रम कामी आले. आज जिल्ह्यात 50 हजार एकरवर द्राक्ष शेती आहे. दरवर्षी अंदाजे 7.5 लाख मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन होते. गुणवत्तेची द्राक्ष निर्यात होते. द्राक्ष शेतीत मोठी गुंतवणूक आणि लाखो मजुरांना रोजगार मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष शेतीसाठी तयार झालेले कुशल मजूर आज शेजारील राज्यांतील शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना आता बेदाण्याचे तंत्रही समजल्याने बेदाण्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. अलीकडील काळात 20 हजार एकरवरील द्राक्षांपासून बेदाणा निर्मिती होत आहे. द्राक्ष उत्पादनासाठी तालुकानिहाय वाणांचे प्रकार वेगवेगळे असले तरी बेदाण्यासाठी मात्र थॉमसन, माणिकचमन, क्लोन टू, सोनाका या वाणाचा वापर केला जात आहे.

द्राक्ष व बेदाणा उत्पादनामध्ये जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक कुटुंबांचा सहभाग आहे. अप्रत्यक्षरीत्या 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठा रोजगार मिळाला आहे.

Share: