हरित सोलापूर

0
हरित सोलापूर

सोलापूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना सोलापूर जिल्हा स्वच्छ व सुंदर राखणे हे सुद्धा असते महत्वाचे. सोलापूर जिल्हा हिरवाईने नटलेला व सुंदर बनावा यासाठी जनजागृती करत आहे सोलापूर सोशल फाउंडेशन.

सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत असताना येथील पर्यावरणाचे रक्षण करणेही आहे तेवढेच महत्वाचे. पर्यावरणाचे रक्षण तेव्हाच होईल जेव्हा निसर्ग जपला जाईल. बेसुमार वृक्षतोड, वाढते प्रदूषण, कचर्‍याच्या समस्या, घटणारे पर्जन्यमान अशा अनेक कारणांमुळे आपला निसर्ग धोक्यात येत असतो. याला आळा घालणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा हरित व समृद्ध व्हावा यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. झाडे तोडण्याऐवजी त्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे, नवीन वृक्षांची लागवड करणे व त्यांची जोपासना करणे, रोपे व सीड बॉल्सचे वाटप, सोसायट्यांना झाडे लावण्यासाठी व त्यांची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहन देणे या काही प्राथमिक गोष्टी सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. सोलापुरात असणारी निसर्गसंपदा जपण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन विशेष प्रयत्न करत आहे. निसर्ग जपला गेला की पर्जन्यमानही वाढेल.

कचरा आणि प्रदूषण या कोणत्याही जिल्हयापुढील प्रमुख समस्यांपैकी महत्वाच्या समस्या असतात. या दोन्ही गोष्टींचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत असतो. वाढता कचरा जिल्ह्याच्या सौंदर्यास बाधा आणतोच, परंतु प्रदूषणाची पातळी वाढविण्यासही करणीभूत ठरत असतो. कचर्‍याचे योग्य वर्गीकरण, ओला कचरा वेगळा करून त्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, कचरा इतस्ततः पसरू न देणे यासाठी संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

सोलापूर जिल्हा हरित व समृद्ध व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे ज्या योजना राबविल्या जात आहेत त्यामध्ये पाण्याचे नियोजन, साठवण, पुनर्भरण आणि पाण्याचा कटकसरीने वापर करून पाणी कसे वाचवता येईल याविषयीही जनजागृती केली जात आहे. पाण्याची नासाडी होण्यापासून वाचविणे म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती जपणे व पर्यायाने पर्यावरणाचेही रक्षण करणे होय.

पाणी वाचवूया, निसर्ग जपूया, सोलापूर जिल्ह्याला हरित बनवूया.