भारताच्या इतिहासात आपले अद्वितीय स्थान राखणारे सोलापूर
कापड गिरण्यांचे शहर, कामगारांचे शहर सोलापूर
सोलापूर... दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. हे शहर भारताच्या इतिहासात आपले विशेष महत्व राखून आहे. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारी खाद्यसंस्कृती तसेच समृद्ध असा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा सोलापूरला लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरचे महत्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. इथल्या वस्त्रोद्योगांमुळे सोलापूरला आजही कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. पूर्वीच्या काळात येथे विडी बनविण्याचे उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालत असत. कापड उद्योग आणि विडी उद्योग यांमुळे येथे खेड्यापाड्यातील अनेक कामगारांना रोजगार मिळत असे. यामुळे 'कामगारांचे शहर' अशीही सोलापूरची ओळख सांगितली जाई.
सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणून सुद्धा ओळखले जात असे. सोलापुरी चादरी असोत वा सोलापुरी शेंगा चटणी, इथली विशिष्ट उत्पादने जगभर आपली विशेष ओळख राखून आहेत. भारत सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरचे ही नाव या यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूर शहर स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसत आहे.


पेठांचे शहर
सोलापूर शहराची रचना नागरिकांना रोजचे व्यवहार सुरळीतपणे करता यावेत यासाठी पेठांच्या स्वरुपात केली गेलेली दिसून येते. सोमवार ते रविवार या वारांच्या नावांच्या पेठांबरोबरच साखरपेठ, भवानीपेठ, आंध्र भद्रावती पेठ, पाच्छापेठ, सिद्धेश्वर पेठ, लक्ष्मीपेठ, बेगमपेठ अशा अनेक पेठांनी बनलेले सोलापूर हे 'पेठांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते.

दुग्धव्यवसाय आणि परंपरा
सोलापूर शहराची दूध व दूध उत्पादनांची गरज भागविणार्या दुग्धव्यवसायाचे केंद्र म्हणजे कसबा पेठ. सव्वाशे वर्षांपासून येथे हा व्यवसाय चालविला जात आहे. आषाढ महिन्यात येथे भरणारी महालक्ष्मी देवीची यात्रा व दिवाळीमध्ये तीन दिवस साजरा केला जाणारा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम ही येथील खास आकर्षणे आहेत.
फोटो गॅलरी
पाहूया एक झलक सोलापूरची....