जलसमृद्ध सोलापूर

0
जलसमृद्ध सोलापूर

पिण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी व उद्योगांसाठी पुरेसे व स्वच्छ, शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे हा ध्यास घेऊन परिश्रम घेत आहे सोलापूर सोशल फाऊंडेशन.

सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान असणारा जिल्हा आहे. भीमा ही येथील प्रमुख नदी व या नदीवरील उजनी धरण हा सोलापूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत आहे. सोलापूर जिल्ह्याचा मोठा भाग दुष्काळप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे येथील नागरिकांना सतत पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. पाणी ही मानवी जीवनाची मूलभूत गरज. पाण्याचा अभाव म्हणजे जीवनाचा अभाव. पाण्याअभावी आयुष्य विस्कळीत होऊन जाते. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर शेती उत्पादन घटते, पिण्यासाठी पाणी नाही व हिरवा चाराही उपलब्ध नाही, अशामुळे जनावरांची उपासमार होते. या सर्वाचा विपरीत परिणाम जनजीवनावर होऊ लागतो, रोगराई वाढू लागते. नागरिकांचे स्थलांतर होण्यास तेथे असणारी पाणी टंचाई हेही कारण महत्वाचे ठरते.

Jalsamruddha Solapur

सोलापूर जिल्ह्याला लागणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी व पिण्यासाठी, दैनंदिन वापरासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी व उद्योगांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे केले जात आहेत. उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन व त्याविषयी जनजागृती करणे, विविध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्राथमिक कार्ये फाऊंडेशनतर्फे राबविली जात आहेत. याचबरोबर कालव्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे, आवश्यक तेथे बंधारे बांधणे, जलस्रोतांमधून गाळ काढणे अशी अनेक कामे राबविली जात आहेत.

पाण्यासारख्या प्रमुख प्रश्नावर तोडगा काढता यावा, संपूर्ण सोलापूर जिल्हा जलसमृद्ध व्हावा हे सोलापूर सोशल फाऊंडेशनचे ध्येय आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशन आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे.