यशोगाथा पहिल्या सोलापूर फेस्टची

भन्नाट उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे पहिले वहिले 'सोलापूर फेस्ट' नुकतेच संपन्न झाले...

'सोलापूर सोशल फाऊंडेशन' ही संस्था नेहेमीच नवनवीन उपक्रमांद्वारे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये संस्थेचे कार्य जोमाने सुरू आहेच, त्याचबरोबर हे कार्य सोलापूर जिल्हयाबाहेर सर्वदूर पोहोचवता यावे, यासाठीही संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांमधील एक महत्वाचा भाग म्हणजे 'सोलापूर फेस्ट'.

सोलापूर जिल्हा म्हणजे अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक व कृषी विषयक विविधतेने समृद्ध असा राज्यातील एक प्रमुख जिल्हा आहे. येथील कापड उद्योग आणि आपले आगळे वैशिष्ट्य जपणारी खाद्यसंस्कृती तर जगभर प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातील या व इतर सर्वच वैशिष्ट्यांना घेऊन पुण्यामध्ये पहिले सोलापूर फेस्ट आयोजित करण्यात आले. येथील लहानमोठ्या व्यवसायिकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी व्यासपीठ मिळावे, सोलापूर जिल्हयाबाहेर त्यांना एक विस्तीर्ण बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी हा यामागील प्राथमिक उद्देश होता.

मा. ना. श्री. सुभाष देशमुख (बापू) यांच्या हस्ते, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर फेस्ट या भव्य प्रदर्शन व महोत्सवाचे उद्घाटन झाले. बापूंनी प्रदर्शनामधील स्टॉल्सना भेट देऊन व्यवसायांची व उत्पादनांची माहितीही घेतली. फेस्टची शान अजूनच वाढली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने. त्यांच्या हस्ते कॉफी टेबल बुक 'श्रीमंती सोलापूरची' चे प्रकाशनही पार पडले.

खरेदी आणि खाणे हा सर्वांच्याच आवडीचा विषय. दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने उपलब्ध असतील तर खरेदीची रंगत अजूनच वाढते. त्याचबरोबर उत्तमोत्तम चवींचे खाद्यपदार्थही उपलब्ध असतील तर अशी संधी कोण दवडेल? नागरिकांची हीच पसंती लक्षात घेऊन सोलापूर फेस्टची योजना आखण्यात आली... आपली दर्जेदार उत्पादने घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विविध व्यावसायिक या फेस्टमध्ये सहभागी झाले. यामध्ये सोलापुरी चादरी, टॉवेल, साड्या, तयार कपडे, बचत गट उत्पादने, शेंगा चटणीसह विविध चटण्या व मसाले, इतर पॅकबंद खाद्य उत्पादने, शेती उत्पादने अशा अनेकविध उत्पादनांच्या खरेदीचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. खरेदीबरोबरच पेटपूजेसाठी व्हेज व नॉनव्हेज अस्सल सोलापुरी चवीच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही खवय्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. भेळ-पाणीपुरी, वडापाव पासून वांगं भाकरी, मटण भाकरी यांसारख्या चमचमीत पदार्थांचा नागरिकांनी आस्वाद घेतला.

या फेस्टमधील आणखी एक आकर्षण म्हणजे येथील कलादालन. फेस्टच्या तीनही दिवशी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांनाही पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांच्या हास्यकल्लोळ या सोलापुरी शैलीतील हास्यविनोदाच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी झाली. दुसर्‍या दिवशी येथे संपन्न झालेल्या सामूहिक अग्निहोत्रामुळे वातावरण मंगल व प्रसन्न झाले. अग्निहोत्रानंतर सोलापुरातील कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. फेस्टच्या तिसर्‍या दिवशी भल्या पहाटे हलक्या गारव्यासह 'पहाटगाण्यांचे' सूर वातावरणामध्ये गुंजले. या कार्यक्रमांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील गुणी चित्रकारांनी काढलेल्या चित्रांनाही उत्तम दाद रसिकांकडून मिळाली.

या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन नागरिकांनी उत्तम प्रतिसाद तर दिलाच, परंतु या फेस्टचे पुन्हा लवकरच आयोजन करण्यात यावे ही प्रेमळ मागणीही अनेक नागरिकांनी केली. पुण्यासह अन्य ठिकाणीही लवकरच 'सोलापूर फेस्ट' निश्चितच आयोजित केली जातील. सर्वांचे जे प्रेम व दाद या प्रदर्शनास लाभली त्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार.

Share: