धर्मवीर संभाजी तलाव

सोलापूर - विजापूर महामार्गावरून जाताना तलावाच्या काठावर उभारण्यात आलेला झाशीच्या राणीचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. हा अतिशय रम्य असा तलाव आहे. या तलावात कमळे फुलतात म्हणून त्याला कमळ तलाव असे म्हणण्याची प्रथा होती. पुढे या तलावाला कंबर तलाव म्हटले जाऊ लागले.

ब्रिटिश सनदी अधिकारी अ‍ॅलन ह्यूम यांच्या मते या तलावाची निर्मिती 3 ते 4 हजार वर्षापूर्वी झालेली आहे. एखादा उल्कापात होऊन मोठा खड्डा पडतो आणि तिथे पाण्याचे झरे फुटून तलाव निर्माण होतो तसा हा तलाव उल्कापातातून निर्माण झालेला आहे असे ह्यूम यांचे म्हणणे आहे.  या तलावात अजूनही जिवंत झरे आहेत. सोलापूर शहरात धर्मवीर संभाजी जलाशय (कंबर तलाव),  त्याचा परिसर आणि स्मृती उद्यान ही नवी पर्यटन स्थळेच झाली आहेत. त्यांच्यामुळे  सोलापूरचं निसर्गवैभव निश्चितच वाढलंय. स्मृती उद्यान हा तर अख्या महाराष्ट्रातला अग्रेसर प्रकल्प ठरला आहे !

संभाजी तलाव हा एक निसर्गरम्य परिसर आहे. या परिसरात थंडीच्या दिवसांत हजारो स्थलांतरित पक्षी आश्रयाला येत असतात. यातले काही पक्षी तर उत्तर ध्रुवावरून येत असतात. नामवंत पक्षी तज्ज्ञ सलीम अली यांना आणि पक्षी जीवनाचा अभ्यास करणार्‍या विहंगप्रेमींना ही जादूईनगरी वाटते. या परिसरात आता  एक सुरम्य स्मृती उद्यान उभं राहिलं आहे. अनेक निसर्गप्रेमी पर्यटक आता या उद्यानाला मुद्दाम भेट देतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते विरंगुळ्याचं चिंतनाचं ठिकाण झालं आहे. तलावाच्या भरावावरूनच विजापूर महामार्ग जातो. तलावाच्या मधोमध रेल्वेमार्ग आहे. रेल्वेतून पाहताना तलावाचे सौंदर्य खुलते.

Share: