उत्सवप्रियच नव्हे, उत्सवांचेच सोलापूर

मराठी, हिंदी, तेलुगु, कन्नड, उर्दू, गुजराती, मारवाडी, जैन, लोधी आणि तांड्यावरील बंजारा अशा असंख्य भाषिकांची मांदियाळी या बहुभाषिक सोलापुरात दिसून येते. शहरात आठ रथ आणि पालख्यांच्या मिरवणुका निघतात. पद्मशाली, कुरुहिनशेट्टी, मद्विरशैव कुरुहिनशेट्टी, स्वकुळसाळी, मडिवाळ माचदेव परीट, नीलकंठ अशा सर्व समाज घटकांचा हा उत्सव. विशेष म्हणजे या सर्व समूह घटकांचे दैवत शिव आहे.

365 दिवसांपैकी 240 दिवस सोलापुरात उत्सवाचे असतात, जे प्रामुख्याने सर्वत्र दिसून येतात. इतरही काही उत्सव असे आहेत, की ते संबंधित छोट्या समुदायातच साजरे होतात. माध्यमांच्या पटलावर येत नाहीत. असे एकूण उत्सव पाहिले तर एकूणच 356 दिवस उत्सवांचेच हे सोलापूर आहे. त्याला कारण येथील बहुभाषिकांची परंपरा.

ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यातील लाखोंचा समुदाय हा फक्त कन्नड भाषिक नाही. त्यात कैक भाषिक समूह असतात. जो तिळगूळ घेऊन गोड बोलण्याची अपेक्षा करतो. अशा सामुदायिक उपक्रमांतून येथील बहुभाषिकांमध्ये एकी टिकून आहे. मराठी, हिंदी, तेलुगु, कन्नड, उर्दू, गुजराती, मारवाडी, जैन, लोधी आणि तांड्यावरील बंजारा अशा असंख्य भाषिकांची मांदियाळी या बहुभाषिक सोलापुरात दिसून येते. अनेक भाषा असल्या तरी सांस्कृतिक एकी आहे. गणेशोत्सवातील लेझीम असो, की नवरात्रातील गरबा यातून हे ऐक्य पाहायला मिळते.

श्रावण सुरू झाला, की बलुतेदारांच्या कुलदैवतांचे उत्सव सुरू होतात. शहरात आठ रथ आणि पालख्यांच्या मिरवणुका निघतात. पद्मशाली, कुरुहिनशेट्टी, मद्विरशैव कुरुहिनशेट्टी, स्वकुळसाळी, मडिवाळ माचदेव परीट, नीलकंठ अशा सर्व समाज घटकांचा हा उत्सव. विशेष म्हणजे या सर्व समूह घटकांचे दैवत शिव आहे. नागपंचमीला नाभिक समाजाच्या वतीने चिम्मटेश्वरांचा रथ निघतो. श्रावणातील शेवटच्या सोमवारी नीलकंठ समाजाच्या वतीने पालखी काढण्यात येते. त्यात भगवान शिवाचे प्रतीक म्हणून शिवलिंगच आहे. महामुनी मार्कंडेय यांचीदेखील शिवाची आराधना करत असलेली मूर्तीच आहे. म्हणजेच भाषा अनेक असल्या तरी त्यांचे दैवत भगवान शिवच आहेत. हीच या समाजाची एकी आहे. श्रावणानंतर चातुर्मासाला सुरुवात होते. जैन बांधवांचे पर्युषण पर्व असते. भाद्रपदेतील गणेशोत्सवापासून नवरात्र आणि पुढे दिवाळीपर्यंत होणार्‍या सणांमध्ये बहुभाषिक सोलापूरकर न्हाऊन निघतात. हे झाले प्रमुख सण.

मानवमुक्तीचा लढा देणारे दलितोद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदेखील मोठा सणच असतो. 14 एप्रिलपासून त्यास सुरुवात होते. तिथून पुढे ठरलेल्या रविवारी मिरवणुका निघतात. ज्या पाहण्यासाठी इतर जिल्ह्यांतून लोक येत असतात. शिवजयंती, शंभूराजेंची जयंतीही सण म्हणूनच साजरी होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जीवा महाले, लहूजी साळवे यांच्या जयंतीदेखील सोलापुरातच साजरी होते. त्यानिमित्ताने वैचारिक जागरही होतो.

आषाढ महिन्यातील तेलुगु भाषिकांचा पोशम्मा तर पंधरा दिवस चालतो. तद्वतच लोधी समाजाच्या वतीने शीतलादेवी उत्सव रंगतो. महाशिवरात्रीला बेडर समूह एकवटतो. भक्त कन्नय्यांची महती सांगतो. माहेश्वरी समाजाची महेश नवमीही अशीच असते. इतकेच काय, उत्तर भारतातील छटपूजाही येथील संभाजी तलावात मोेठ्या प्रमाणात दिसून येते. तमिळनाडूतील पोंगल, नवरात्रातील अष्टमीचा ब्रतुकम्मा (भोंडला) ही परप्रांतातील संस्कृतीही सोलापुरातच दिसून येते. सण, चालीरीती, रूढी आणि परंपरा जपत सोलापूरकर आपले स्वतःचे वेगळे स्थान टिकवून आहेत.

ग्रामीण भागही अशा उत्सव-परंपरांनी समृद्ध आहे. लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी गुळ्ळव्वा परंपराही अशीच. आषाढात दर मंगळवार-बुधवारी मुले-मुली मातीपासून नंदी आणि इतर सृजन, तसेच पारंपरिक खेळात रमेलेले असतात. याशिवाय, वेळ अमावास्या, बेळ्ळ बटला अशा कितीतरी परंपरा आजही तग धरून आहेत. गावोगावच्या जत्रा, तेथील परंपरा, लोकगीते यामध्ये शेकडो संशोधक विद्यार्थ्यांना पुरून उरेल इतकी समृद्धी निश्चितच आहे.

Share: