मेडिकल टुरिझम

3000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आहे.सोलापूर हे सध्या वैद्यकीय उपचारांचे मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. तसे ते पूर्वीपासून लगतच्या सात-आठ जिल्ह्यांतील रुग्णांना त्यांच्या गावात उपलब्ध नसलेला प्रगत उपचार देणारे ठिकाण म्हणून ओळखले जात होतेच. पण अलीकडे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अशा काही गोष्टींची भर पडली आहे की कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रातील दूरदूरचे रुग्ण सोलापूरला यायला लागले आहेत. महाराष्ट्रालगत असलेल्या चार ते पाच राज्यांत सोलापूरला थेट रेल्वेने येण्याची सोय आहे. पुणे आणि मुंबईतल्या सर्वप्रकारच्या पराकोटीच्या प्रगत सोयी सोलापुरात पुणे मुंबईपेक्षाही कमी दरात उपलब्ध होत असतात. सोलापुरात पाच सहकारी रुग्णालये असून राज्य सरकारचे प्रचंड मोठे  700 खाटांचे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा विस्तार करण्याचे काम सुरू असून ते आता 1300 खाटांचे होणार आहे. या शहरात वैद्यकीय उपचाराच्या सर्व शाखांचे एक हजारावर तज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहेत. तर 275 नोंदणीकृत दवाखाने आहेत. यातली 28 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. गेल्या दोन वर्षात प्राप्त झालेल्या माहितीवरून या जिल्ह्यात दरसाल 500 कोटी रुपयांची औषधे विकली आणि वापरली जात असतात.

शासकीय रुग्णालयात सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. त्याला जोडून डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे तज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता भासत नाही. सार्वजनिक स्वरूपाचे एवढे मोठे रुग्णालय सोलापूरच्या आसपासच्या सात-आठ जिल्ह्यांत तर नक्कीच नाही. अलीकडेच अश्विनी मेडिकल कॉलेज हे महाविद्यालय निघाले असून त्यालाही जोडून कुंभारी येथे प्रचंड मोठे रुग्णालय आहे. ग्रामीण भागातील जनतेला हे वरदान ठरले आहे. सोलापुरात सखाराम नेमचंद आयुर्वेदिक महाविद्यालय आणि दोन होमिओपॅथी महाविद्यालये आहेत. त्या व्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयसुद्धा आहे. या सगळ्या सोयीमुळेे महाराष्ट्र आणि आंध्रातले हजारो रुग्ण सोलापूरला उपचारासाठी येत असतात.

सोलापुरात येण्यासाठी वाहतुकीच्या सोप्या सोयी उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना सोलापुरात येणेही सोपे जाते. त्याचाही फायदा रुग्ण घेतात. अलीकडे करण्यात आलेल्या पाहणीमध्ये असे आढळून आले आहे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या तीन राज्याव्यतिरिक्त मध्य प्रदेश आणि गुजरातमधील रुग्णही सोलापूरला यायला लागले आहेत. कोणत्याही अवघड उपचारासाठी सोलापूर सोडून पुणे किंवा मुंबईला जावे लागत नाही. सगळ्या प्रकारचे उपचार सोलापुरात उपलब्ध आहेत.

Share: