गणेशोत्सवासाठी लोकमान्यांना प्रेरणा

1885 सालची मूर्ती जुनी झाल्याने 1893 साली केरळच्या कलाकारांकडून तणस, गूळ, कापड, गवत, शाडू, डिंक या साहित्यांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मूर्ती बनविण्यात आली. केवळ सुरुवात न करता इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आजपर्यंत अवलंब करण्याचा आदर्श आजोबा गणपती ट्रस्टने ठेवला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली. मात्र त्यांची प्रेरणा होती सोलापुरातील आजोबा गणपती. सन 1885 मध्ये सोलापुरात श्री श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीची स्थापना झाली. यावेळी सारा देश पारतंत्र्यात होता. आज आजोबा गणपती लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

दरवर्षी हजारो भक्त आजोबा गणपतीच्या दर्शनसाठी रीघ लावतात. सन 1885 पासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जावू लागला. त्यावेळी त्रिपुरांतकेश्वर मंदिरात गणपतीची मूर्ती ठेवली जात होती व शेटेच्या पटांगणात 10 दिवसांचा उत्सव साजरा केला जात असे. 1892 मध्ये सोलापुरात वारदांचे घरी लोकमान्य टिळक आले होते. त्यावेळी गौरीगणपतीचा उत्सव शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यासमोर चालू होता. मान्यवरांना पानसुपारी व चहापानासाठी बोलवले जात. या कार्यक्रमासाठी वारद व लो. टिळकांना आमंत्रित केले होते. जेव्हा टिळक शेटे यांच्या घरी आले तेव्हा गणपतीची भव्य

मूर्ती व गणपतीचा कार्यक्रम पाहून भारावून गेले. गणेशोत्सव सार्वजिनक करण्याचा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. यानंतर पुण्यात गेल्यानंतर या विचारांचे कृतीत रूपांतर होऊ लागले. सन 1893 मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. मात्र 8 वर्षांपूर्वीच सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ झाला होता. माणिक चौक येथे आजोबा गणपतीचे मंदिर असून मूर्तीची उंची 8 फूट इतकी आहे.

Share: