नवा राजवाडा

नवा राजवाडा म्हणजे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती आहे. 1910 मध्ये याचे बांधकाम सुरू झाले. तेरा वर्षांनी, 1923 मध्ये पूर्ण झाले. हा राजवाडा त्याच्या भव्यतेने दीपवून टाकतो. तो पाश्चात्य शैलीत आहे. तो अष्टकोनी, तीन मजले उंच आहे. असंख्य खोल्या,  दालने आहेत.

अक्कलकोटनगरीत गेल्यानंतर आवर्जून भेट दिली पाहिजे असे ठिकाण म्हणजे दुर्मिळ शस्त्रागार होय. एका व्यक्तीने उभारलेले आशिया खंडातले हे सर्वात मोठे शस्त्रागार.

अक्कलकोटचे संस्थान छत्रपती शाहू महाराजांच्या सातार्‍याच्या गादीबरोबर आकारास आले. राजे फत्तेसिंह भोसले हे शाहूंचे मानसपुत्र. ते या संस्थानचे पहिले राजे! ती गोष्ट 1707 सालची. पुढे 1896 ते 1923 मध्ये फत्तेसिंह भोसले (तिसरे) हे राजे होऊन गेले. त्यांचे कर्तृत्व मोठे होते. त्या राजाच्या काळातच अक्कलकोटचा नवा राजवाडा आणि त्यांचे शस्त्रागार उभे राहिले.

राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रागार आहे. राजे फत्तेसिंह भोसले (तिसरे) यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता. त्यांना अवघे अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी रणांगणावर पराक्रम गाजवलाच, त्याबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार 1922 मध्ये आकाराला आले. सुरुवातीची अनेक वर्षे संग्रहालय अक्कलकोटचा जुन्या किल्लेवजा राजवाड्यात होते, ते सुरक्षिततेच्या कारणास्तव 2002 मध्ये नव्या राजवाड्यात हलवण्यात आले. अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण आणि आणखी कितीतरी...

त्या हत्यारांचे वैविध्य आणि संख्याबळच प्रेक्षकाचे डोळे दीपवून टाकते. ते आशियातील मानाचे शस्त्र संग्रहालय मानले जाते.

Share: