करमाळा

भूतलावर श्री जगंदबादेवीची 108 रूपे आणि 51 शक्तिपीठे आहेत. त्यातच करमाळा येथील श्री कमलाभवानीदेवी मंदिराचा समावेश होतो.

करमाळा शहरापासून अर्ध्या किमी अंतरावर काळ्या पाषाणातील हेमांडपंथी मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. 5 गोपुरे, घाटांचे शिखर, विशाल दरवाजे यातून दाक्षिणात्य शिल्पकलेचे दर्शन घडते. कमलादेवी मंदिरात अंकाचे महत्त्व आहे. 

मंदिर 96 खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायर्‍या आहेत. मंदिरात 96 ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली 96 पायर्‍याची विहीर मंदिर परिसरातच आहे. या विहिरीची रचना खूपच भव्य आणि आकर्षक आहे. सैराट चित्रपटामुळे करमाळा तालुका आणि परिसर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. मंदिर परिसराला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. करमाळा तालुक्याचा काही परिसर उजनी धरणाच्या जलाशयाने (बॅकवॉटर) व्यापला आहे. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे आहे. राजे रावरंभा यांनी मंदिराची उभारणी केली. मुख्य मंदिर तीन गाभार्‍यात विभागले असून मुख्य गाभार्‍यात कमलाईची अष्टभूजा मूर्ती आहे. श्री कमलादेवी सिंहावर आरुढ असून महिषासुराचे निर्दालन करणार्‍या आवेशात आहे. उजव्या हातात गदा, तलवार, सुदर्शन चक्र व सिंहाचे शेपूट धरलेले आहे. डाव्या हातात शंख मुसंडी राक्षसाची शेंडी व एका हातातील बर्ची महिषासुराच्या शरीरात खुपसलेली आहे. त्याच्या शेजारीच महिषासुराचे मुंडके पायदळी व बाजूला रेड्याचे मुंडके अशी मूर्ती आहे.

Share: